९४ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
९४ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक २६ ते २८ मार्च २०२१ दरम्यान नाशिक येथे आयोजित केले जाणार आहे.
संमेलनाच्या
अध्यक्षपदी जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान कथालेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांची एकमताने निवड
झाल्याची अधिकृत घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिक राव ठाले पाटील यांनी केली.
संमेलनाध्यक्षपदी
निवड झाल्यावर डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया :
‘तरुण पिढीवर विश्वास ठेवून आपण विज्ञाननिष्ठा
कशी वाढेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. साहित्याद्वारे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी
उपाय करू शकतो. विज्ञान हे साहित्यातून कसे मांडता येईल याबाबतचे माझे विचार अध्यक्षीय
भाषणातून मांडणार आहे.’
डॉ. जयंत नारळीकर यांच्याबद्दल
थोडक्यात
अल्प परिचय : चार
दशकांहून अधिक कालावधीपासून डॉ. नारळीकरांचे खगोल भौतिक क्षेत्रात संशोधन सुरु
आहे. त्याचबरोबर सतत पुस्तके लिहिणेही सुरूच आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र
समजावण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहे. त्यासाठी सर्व
प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. तसेच ते विश्वोत्पत्तीशास्त्राचे सुद्धा अभ्यासक
आहेत.
जीवनप्रवास : डॉ.
जयंत विष्णू नारळीकर हे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ तथा लेखक आहेत. त्यांचा जन्म १९
जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध गणितज्ज्ञ रँग्लर विष्णू
वासुदेव नारळीकर वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख
होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. जयंत
नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे हिंदी माध्यमातून झाले. १९५७ मध्ये त्यांनी
विज्ञानात पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांनी गणित
विषयात बी.ए., एम.ए. व पीएच.डी. च्या पदव्या मिळविल्या. शिवाय रँग्लर ही पदवी,
खगोलशास्त्राचे टायसन मेडल ,स्थिम पुरस्कार व इतर अनेक बक्षिसेही पटकावली.
केंब्रिज विश्वविद्यालयात अंतिम वर्षात प्रथम वर्गात उत्तीर्ण होणा-यांना “रँग्लर”
हा किताब दिला जातो.
नारळीकर यांचा विवाह १९६६
मध्ये मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ज्ञ) यांच्याशी झाला. त्यांना गीता, गिरिजा व
लीलावती अशा तीन कन्या आहेत. १९७२ मध्ये ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा
मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुखपद स्विकारले.
१९८८ मध्ये त्यांची पुणे येथील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅण्ड
अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA)
म्हणजेच आयुका या संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. NCERT च्या शालेय
पाठ्यपुस्तक समितीत विज्ञान आणि गणित या दोन विषयांच्या सल्लागार समितीचे ते
प्रमुख होते.
पुरस्कार : डॉ.
नारळीकर यांच्या महान कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी
घेतली. त्यामुळे त्यांना अनेक मान – सन्मान प्राप्त झाले. भारत सरकार कडून १९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण, तर २००४ मध्ये
पद्मविभूषणने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना २०१० मध्ये महाराष्ट्र
शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवाय डॉ. भटनागर स्मृती
पारितोषिक, एम. पी. बिरला सन्मान आणि फ्रेंच अॅस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स
ज्यूल्स जेन्सन यांसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले. लंडनच्या रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल
सोसायटी ते सहाधिकारी आहेत, तर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी
ऑफ सायन्सेसचे ते अधिछात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या इंदिरा गांधी पारितोषिकानेही
त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयांत साहित्यिक लिखाण करून विज्ञानाचा
प्रसार करण्यासाठीही त्यांना १९९६ मध्ये युनेस्कोने कलिंग पारितोषिक देऊन त्यांचा
सन्मान केला आहे. ‘चार नगरांतले माझे विश्व’ या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या
साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला
महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार. अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक
जीवनगौरव पुरस्कार (२०१२). फाय फाउंडेशन, इचलकरंजीतर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण
पुरस्कार प्राप्त झाला आहे.
लेखन संपदा : विविध
मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन
सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांची पुस्तके जगातील विविध भाषांमध्ये
भाषांतरित झालेली आहेत.
विज्ञानकथा – पुस्तके : अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट,
अभयारण्य, चाल जाऊ आवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी,
याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस
इतर विज्ञानविषयक पुस्तके : अंतराळ आणि
विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे (सहलेखन : डॉ.
अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, युगायुगाची जुगलबंदी
गणित अन् विज्ञानाची (आगामी), विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक,
विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, सूर्याचा प्रकोप, विज्ञानाचे रचयिते
समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व
अभयारण्य या पाच कादंब-यांचे एकत्रित पुस्तक).
आत्मचरित्र : चार
नगरांतले माझे विश्व, पाहिलेले देश भेटलेली माणसं, समग्र जयंत नारळीकर
याशिवाय
इंग्रजीत त्यांची Seven
Wonders of The Cosmos, From Black Clouds to Black Holes, Violent Phenomena in
The Universe
आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत.
तर
अशा प्रकारे विज्ञानविषयक साहित्यात विपुल लेखन असणारे जेष्ठ शास्त्रज्ञ व
खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर हे २६ ते २८ मार्च दरम्यान नाशिक येथे भरणा-या ९४
व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लाभल्याने साक्षात विज्ञानाची
गंगाच गोदातीरी अवतरणार आहे असेही म्हणता येईल.
साहित्य संमेलनाचा इतिहास : नाशिकचेॠणानुबंध
९४ व्या आखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनाचे यजमानपद नाशिकला मिळाले आहे. तसे बघायला गेले, तर पहिल्या
साहित्य संमेलनापासूनच नाशिकचे ॠणानुबंध जोडले गेले आहेत.
Ø
पुण्यात १८७८ मध्ये झालेल्या पहिल्या
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
नाशिकच्याच मातीतले. त्यांचा जन्म नाशिकच्या निफाड तालुक्यातील.
Ø
नाशिकच्याच भगूर येथे जन्मलेल्या
विनायक दामोदर सावरकर यांनी मुंबईत १९३८ मध्ये झालेल्या २३ व्या आखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.
Ø
सारस्वतांची मांदियाळी असलेल्या २७
व्या संमेलन आयोजनाची संधी नाशिकला प्रथमच १९४२ मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात
मिळाली. प्रल्हाद केशव अत्रे यांनी नाशिकला झालेल्या या पहिल्या संमेलनाचे
संमेलनाध्यक्षपद भूषविले होते.
Ø
जन्माने जरी नाशिककर नसले तरी
वास्तव्यास नाशिकमध्ये असणारे प्राध्यापक वसंत कानेटकर यांनी १९८८ मध्ये ठाणे येथे
भरलेल्या ६१ व्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षाची जबाबदारी सांभाळली होती.
Ø
६३ वर्षांनंतर नाशिकला दुस-यांदा
२००५ मध्ये साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले. संमेलनाध्यक्ष केशव मेश्राम यांच्या
नेतृत्वाखाली ७८ वे साहित्य संमेलन मविप्र संस्थेच्या प्रांगणात पार पडले होते.
Ø
या सारस्वतांच्या मेळ्याचे नेतृत्व
करण्याची आणखी एक संधी डिसेंबर २०१० मध्ये मिळाली. ठाणे येथील ८४ व्या साहित्य
संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषविले
होते.
Ø
गेल्या वर्षी संमेलन आयोजनासाठी
प्रयत्न सुरु असताना ऐनवेळी उस्मानाबाद हे ठिकाण निश्चित करण्यात आले होते. मात्र,
यंदा ९४ वे साहित्य संमेलन नाशिकच्या भूमीत होत असल्याने सारस्वतांच्या
स्वागतासाठी ही नगरी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
FOr more update please visit :-https://spectrumacademyonline.in/